
नागपूर प्रतिनिधी
“प्रेम गुन्हा आहे का? आम्ही दोघेही सज्ञान आहोत, संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला फक्त सुरक्षितपणे संसार जगायचा आहे!” — रबा महेरोश
जात, धर्म, रूढी यापलीकडचं नातं म्हणजे प्रेम. आणि हेच सिद्ध केलंय मुस्लिम समाजातील राहील शेख (२६, परभणी) आणि रबा महेरोश (२२, बिदर-कर्नाटक) या प्रेमियुगुलाने. समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी निकाह केला. मात्र त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं रूपांतर संघर्षात झालं. जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर या दोघांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गृह’ जिल्ह्यात येत आश्रय मागितला आहे.
चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून राहील आणि रबाची ओळख झाली. मैत्रीतून सुरू झालेलं हे नातं हळूहळू प्रेमात परिवर्तित झालं. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र रबाच्या कुटुंबीयांना हे प्रेम मान्य नव्हतं. तिच्या घरच्यांनी तिचा निकाह दोन मुलांचा बाप असलेल्या वृद्धाशी ठरवला. परिस्थितीच्या विरोधात जाऊन रबा २ जुलै रोजी घरातून पलायन करत नांदेडमार्गे परभणीत राहीलकडे आली.
यादरम्यान रबाच्या कुटुंबीयांनी राहीलला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या धोक्यामुळे घाबरलेलं हे प्रेमियुगुल थेट नागपुरात आलं आणि शहरातील कामठी मार्गावरील मदिना मदरसा येथे त्यांनी धार्मिक रीतिरिवाजानुसार शांततेत निकाह केला.
मात्र, दोघांनाही अजूनही जीवभिती वाटते. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना रबा म्हणाली, “आम्ही काही गुन्हा केलेला नाही. आम्हाला फक्त आमचं प्रेम आणि संसार सुरक्षित ठेवायचा आहे. आमच्या विरोधात सख्खे भाऊ, सावत्र व्यक्ती आणि वडीलही आहेत. ते जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.”
राहीलने सांगितलं की, “माझ्या आजारी वडिलांना देखील गाव सोडावं लागलं. आमचं कुटुंब माझ्या नोकरीवर जगतं. पण जीवाच्या भीतीने आम्हाला नागपूरसारख्या अनोळखी शहरात शरण यावं लागतं आहे.”
या साऱ्या घटनाक्रमामुळे त्रस्त झालेल्या या युगुलाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे की, “आम्ही तुमच्या जिल्ह्यात आलो आहोत, आम्हाला केवळ सुरक्षितता हवी आहे. कोणाविरुद्धही तक्रार नाही. पण आमचं आयुष्य वाचवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत.”
हे प्रेमियुगुल सध्या नागपुरात सुरक्षिततेच्या आशेवर राहत असून राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सामाजिक स्तरावरूनही होत आहे.
राहील आणि रबासारख्या अनेक प्रेमीयुगुलांना आजही धर्म, जात, समाज आणि कुटुंबियांच्या रूढींच्या बेड्या तोडून जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रेमाला मोकळं आकाश देण्याचं काम जर राज्यघटनेनं केलं असेल, तर त्याचे रक्षण करण्याचं काम राज्यकर्त्यांचं आहे.