
मुंबई प्रतिनिधी
राज्यात सध्या मराठी विरुद्ध अमराठीचा मुद्दा चांगलाच पेटला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक मोठा पाऊल उचललं आहे. ५ जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या ‘विजयी मेळाव्या’नंतर आता १८ जुलै रोजी मिरा रोड येथे राज ठाकरे मोठी सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मनसेने एल्गार पुकारला. याच मुद्द्यावर ठाकरे गटही मैदानात उतरला आणि दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे सरकारच्या जीआरविरोधात मोर्चेबांधणी केली. परिणामी, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतले.
या यशानंतर मुंबईत ५ जुलै रोजी ‘विजयी मेळावा’ घेण्यात आला. यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित व्यासपीठावर येणं हेच चर्चेचा विषय ठरलं. या भेटीनंतर ठाकरे-राज ठाकरे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
दरम्यान, मिरा-भाईंदरमध्ये मराठी- अमराठी वाद पुन्हा चिघळला. एका मिठाई विक्रेत्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. या घटनेनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी ८ जुलै रोजी मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा भाजपप्रेरित असून मराठी समाजाला डिवचण्यासाठीच काढण्यात आल्याचा आरोप मनसेने केला.
त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनेही मोठा मोर्चा काढत रस्त्यावर उतरण्याची ताकद दाखवून दिली. या मोर्चाला प्रचंड जनसमर्थन लाभलं. या पार्श्वभूमीवरच १८ जुलै रोजी राज ठाकरे मिरा रोडमध्ये सभा घेणार आहेत. ही सभा ‘आभार सभा’ असेल, असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या सभेमध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडणार, आंदोलनाच्या पुढील दिशा काय असतील, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक अवतारात दिसणार का? मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे नेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.