मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील प्रतिष्ठित जे. जे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण डॉक्टरने सोमवारी रात्री उशिरा अटल सेतूवरून थेट समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर ओंकार भागवत कवितके (वय ३२) असे या बेपत्ता डॉक्टरचे नाव असून, त्यांचा शोध घेण्यासाठी मागील ३६ तासांपासून पोलिस आणि बचावपथक युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.
सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास डॉक्टर कवितके यांनी आपल्या होंडा कंपनीच्या कारला अटल सेतूवर थांबवले आणि मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून समुद्रात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही वेळातच सेतूवरील सीसीटीव्ही फूटेज आणि घटनास्थळी आढळलेल्या कार आणि आयफोनच्या आधारे ही बाब स्पष्ट झाली.
अटल सेतू नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीवरून उलवे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाडी आणि मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. कळंबोलीतील सेक्टर २० मध्ये अविनाश सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टरच्या बहिणीला, कोमल लंबाते यांना तातडीने पोलिस ठाण्यात बोलावून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली.
या दुर्दैवी घटनेमुळे अटल सेतूवरील आत्महत्यांच्या मालिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून अटल सेतूवर आत्महत्या करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, बँक मॅनेजर आणि अभियंत्यांसारख्या उच्चशिक्षितांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, डॉक्टर ओंकार यांच्या शोधासाठी सागरी सुरक्षा दलाच्या ‘ध्रुवतारा’ बोटीच्या सहाय्याने व्यापक शोधमोहीम सुरु असून अद्याप त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “बेपत्ता डॉक्टरांबाबत कुणाला काही माहिती असल्यास ०२२-२०८७०६७० या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.”
घटनेचा तपास सुरु असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


