
देवेंद्र फडणवीस आज विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात, छावणी चालकांना दिलासा मिळणार का, प्रश्न अनुत्तरितच
सोलापूर प्रतिनिधी
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील तब्बल २१० चारा छावणी चालकांच्या ३३ कोटी ४४ लाख ९९ हजार रुपयांची थकीत देयके सहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक चालक आर्थिक विवंचनेत अडकले असून, काहींनी आत्महत्येचाही विचार सुरू केला आहे. यंदाच्या आषाढी वारीत ‘विठ्ठल’ सरकारला सुबुद्धी देईल का? असा प्रश्न छावणी चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उमटत आहे.
२०१४ ते २०१९ मधील छावणीसाठी खर्च, पण पैसे मिळालेच नाहीत
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या दुष्काळग्रस्त चारा छावण्यांच्या थकीत देयकाचा मुद्दा अनेकदा उपस्थित करण्यात आला. २२ मार्च २०२३ रोजी या प्रकरणात शासन स्तरावर अनुदान अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही.
दादा भुसे यांनी विधान परिषदेतील उत्तरात सांगितले होते की, मुख्य सचिवांच्या समितीच्या निर्णयानंतर निधी वितरित केला जाईल. मात्र, तो निर्णयही ‘प्रलंबित’ फाईलमध्येच अडकून बसल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीही गप्प, शिंदे सरकारचाही शब्द हवेत
महाविकास आघाडीच्या काळातही छावणी चालक मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत होते, पण कोणतीही आर्थिक तरतूद झाली नाही. पुढे ४ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा शब्द दिला, मात्र आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही.
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना वेळ न दिल्यामुळे झालेल्या वादात, त्यांच्यावर “शासकीय कामात अडथळा” आणल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
आ. समाधान आवताडे यांचा संसदेत सवाल: बिलं द्या, आत्महत्या थांबवा!
मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार समाधान आवताडे यांनी आवाज उठवला. त्यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला की, “इतकी वर्षं बिले प्रलंबित का? आत्महत्या करणाऱ्यांना जबाबदार कोण?” यावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आश्वासन दिले की, “मुख्य सचिवांना आजच निर्देश देतो. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावू.” पण प्रत्यक्षात छावणी चालकांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही.
बिलं अडकलेली, राजकारण मात्र रंगलेलं!
हे विशेष उल्लेखनीय आहे की, थकीत बिलं असलेल्या छावणी चालकांचा मोठा भाग भाजपचे स्थानिक नेते प्रशांत परिचारक यांचे समर्थक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबत उभं राहण्याची भूमिका घेतली. तरीही त्यांच्यावर अन्यायच झाला आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर दौऱ्यावर आहेत. म्हणूनच छावणी चालक व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात एकच अपेक्षा — “या पंढरीच्या वारीत विठ्ठल त्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुबुद्धी देईल का?”
छावणी चालकांचे प्रश्न केवळ आकडेवारी नाहीत, तर ते शेतकऱ्यांच्या जगण्याच्या संघर्षाची वेदना आहेत. राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेवून, मानवी संवेदनांचा विचार करावा आणि थकीत बिले तात्काळ अदा करावीत अशी छावणी मालकांनी व्यथा बोलून दाखवली.