
सोलापूर प्रतिनिधी
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला व बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी दौंडमार्गे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. परिणामी उजनी धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढत आहे. जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने भीमा नदीत विसर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशी यात्रा व वारकऱ्यांच्या चंद्रभागा स्नानासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून उजनी धरणातून पाणी सोडणे तात्पुरते थांबवण्यात आले होते. मात्र, यात्रा संपल्याने आता पुन्हा धरणातील पाणी भीमा नदीमार्गे सोडले जाणार आहे. उजनी धरणाचे १६ दरवाजे २० सेंटीमीटरपर्यंत उचलून विसर्ग सुरू होईल, अशी अधिकृत माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
धरणात सध्या १०५.९५ टीएमसी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त साठा ४२.३२ टीएमसी इतका आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी ७९ आहे. दरम्यान, दौंड येथून सध्या १३ हजार ४९३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे उजनी धरण जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
धरणाच्या मुख्य कालव्यातून १७०० क्युसेक, सीना-माढा सिंचन योजनेसाठी १२० क्युसेक, भीमा-सीना बोगद्यासाठी ९०० क्युसेक आणि दहिगाव उपसा योजनेसाठी १०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
एकूण ११७ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात अतिरिक्त ६ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असून, पावसाळ्यातील वाढीव आवकेचा विचार करता पुढील काही दिवसांमध्ये विसर्गाचे प्रमाण अधिक वाढवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलसाठा नियंत्रणात राखत नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.