
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर | तरुणांना गांजासह नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्याचा समावेश आहे.
गांजा व इंजेक्शन विक्री प्रकरणी सोहिल संभाजी मोहिते (२४, रा. जाधव पार्क, जरगनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रामानंदनगर परिसरातील भांडणानंतर मोहिते दुचाकी सोडून फरार झाला होता. पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा व इंजेक्शन आढळले. यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने सखोल तपास केला असता, पुरवठादार रोहन संजय चव्हाण (३३, कवडे गल्ली, कसबा बावडा) आणि अजय श्रीकांत डुबल (४४, शिंदे मळा, खोतवाडी) यांची नावे निष्पन्न झाली.
तिघांच्या चौकशीत डुबल हा इचलकरंजी, शहापूर येथे मेडिकल चालवतो तसेच तो खोतवाडी ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य असल्याचे उघड झाले. आरोपींकडून मेफेटेरामाईन सल्फेटच्या तीन बाटल्या आणि आय.पी. मेझोलमचे ८० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या इंजेक्शनची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीविना होत असल्याचे समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, अरविंद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सांगलीतील पुरवठादारांचा शोध सुरू असून, तपास अधिकच खोलात सुरू आहे.