
धाराशिव प्रतिनिधी
विठ्ठलभक्तीच्या ओढीने पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या धाराशिवच्या एका महिला वारकऱ्याचा वाखरीजवळ अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृदुंगाच्या गजरात, टाळ-चिपळ्यांच्या नादात ‘माऊली माऊली’चा गजर करत चाललेल्या उषाताई व्यवहारे यांचं विठुरायाच्या भेटीचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
मृत वारकरीचे नाव उषा अशोक व्यवहारे (वय अंदाजे ५५, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) असं आहे. त्या गावातील इतर महिला भाविकांसोबत पायी वारीसाठी निघाल्या होत्या. मात्र, काल मध्यरात्री सुमारास वाखरीजवळ रस्ता ओलांडत असताना दिंडीतीलच एका ट्रकने त्यांना चिरडलं. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. उषाताईंनी विठोबाच्या भेटीसाठी सुरु केलेला 250 किमीचा प्रवास केवळ काही अंतर शिल्लक असतानाच थांबला, ही बाब हृदयाला चटका लावणारी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर गावकरी, नातेवाईक व सोबतच्या महिला भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे वारी मार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनावर आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असताना वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
सरकारची ४ लाखांची आर्थिक मदत
आषाढी वारीदरम्यान जर कोणत्याही वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. ही मदत १६ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत लागू राहील.