
मुंबई प्रतिनिधी
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची मंगळवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर चव्हाण यांनी डंके की चोटवर पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली – “राष्ट्रवादाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार, २०२९ च्या विजयानंतरच थांबणार!”
वरळी येथील डोममध्ये पार पडलेल्या राज्य परिषदेच्या भव्य अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पक्षाचा ध्वज स्वीकारला आणि नवे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. हजारो कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले, तर फटाक्यांच्या आतषबाजीत नव्या नेतृत्वाचे स्वागत करण्यात आले.
“सामान्य घरातून आलो, पण जबाबदारी असामान्य”
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मी एका सामान्य कुटुंबातून आलो असून, भाजपासारख्या विशाल पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला देण्यात आली ही अत्यंत गौरवाची बाब आहे. ही संधी फक्त भाजपातच शक्य आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांवर सातत्याने अपप्रचार केला जात आहे. कार्यकर्त्यांनी हे खोडून काढत सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. रामभाऊ म्हाळगी यांचं तत्त्व ध्यानात ठेवत ‘पायाला भिंगरी, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर’ या भूमिकेतून कामाला लागा.”
बावनकुळे यांचा निरोप आणि आत्मपरीक्षण
मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात तीन वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. “शुरुवातीला जबाबदारी पेलू शकेन की नाही याची शंका होती. मात्र दीड कोटी सदस्य नोंदणीचा विक्रम आपण सर्वांच्या मदतीने साध्य केला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही याची खंत जरूर आहे. मात्र विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवण्यात आपण यशस्वी ठरलो.”
बावनकुळे यांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देताना सांगितले की, “रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ५१ टक्के मतांसह सर्वाधिक महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणण्याचा संकल्प भाजप पूर्ण करेल.”
शेलार, फडणवीस आणि किरण रिजिजू यांची उपस्थिती
मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी चव्हाण यांना एक कर्मठ, जिद्दी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेता म्हणून गौरवले. “चव्हाण हे विरोधकांना त्यांची जागा दाखवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, विनोद तावडे, शिवप्रकाश, अरुण सिंह, उदयनराजे भोसले, रक्षाताई खडसे, पंकजाताई मुंडे, राहुल नार्वेकर, राम शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
या परिवर्तनाने भाजपच्या राज्य कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. २०२९ च्या निवडणुकीसाठी सध्या पासूनच रणशिंग फुंकले गेले असून, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.