
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे आणि त्यांच्याशी संबंधित असलेले दुर्मीळ छायाचित्रे व माहिती असलेले सात खंडांचे ग्रंथ आता कोल्हापुरात उपलब्ध झाले आहेत. या ग्रंथसंग्रहाच्या प्रतिका सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रात दाखल करण्यात आल्या असून, आता त्या अभ्यासक आणि इतिहासप्रेमींना सहज पाहता येणार आहेत.
या दुर्मीळ ग्रंथांचे नाव ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ असे असून त्याचे लेखक आहेत भावनगरचे भावसिंहजी महाराज छत्रपती शाहू महाराजांचे जिवलग मित्र, सहाध्यायी आणि स्नेही. या ग्रंथाचे प्रकाशन १९११ साली झाले होते.
विशेष म्हणजे, छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये झाले होते. या ग्रंथात त्यांच्यासह अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश आहे.
सुमारे २० किलो वजनाचे, हार्ड बायंडिंग असलेले हे ग्रंथ केवळ वजनानेच नव्हे, तर माहितीच्या दृष्टीनेही अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान आहेत.
भावसिंहजी महाराज हे केवळ शासक नव्हते, तर ते कविता, संगीत आणि कलांचा गाढा अभ्यासक होते. बी. टी. या टोपणनावाने काव्यलेखन करणारे भावसिंहजी अनेक नामवंत कवी, गायक यांचे आश्रयदाता होते.
त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना शाहू महाराजांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या मार्गाला ‘भावसिंहजी रोड’ असे नाव दिले. तर भावसिंहजींनीही आपल्या महुआ येथील राजवाड्यास ‘शाहू पॅलेस’ असे नाव देत आपला स्नेह अमर केला.
ही ग्रंथमालिका केवळ शाहू महाराजांबद्दलच नव्हे, तर त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावर प्रकाश टाकणारा मौल्यवान ऐवज ठरते, असा अभ्यासकांचा सूर आहे.