
मुंबई प्रतिनिधी
शहरात पुन्हा एकदा अभ्यासाच्या तणावाने किशोरवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या अस्मि चव्हाण (वय १५) या विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी भांडुपमधील एका उंच इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले.
अस्मि ही मुलुंड परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मंगळवारी सायंकाळी ती भांडुपमधील एल.बी.एस. रोडवरील ‘महेंद्र स्प्लेंडर’ या ३१ मजली इमारतीत राहणाऱ्या तिच्या मित्राला आदित्य याला, भेटण्यासाठी गेली होती. प्राथमिक माहितीनुसार, अस्मि अभ्यासाच्या वाढत्या तणावामुळे नैराश्यात होती.
मित्राने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर दोघेही खाली जाण्यासाठी लिफ्टकडे निघाले असताना अचानक अस्मिने ३१ व्या मजकुरावरून उडी मारली.
इमारतीतील स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपमृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी आदित्यची चौकशी केली असून, अस्मि गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाच्या तणावाखाली होती, असे त्याने सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून, विद्यार्थ्यांवर येणारा अभ्यासाचा मानसिक ताण आणि त्यावर उपाययोजना याबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंतन आवश्यक असल्याचे चित्र आहे.