
मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मुळगावी जाण्याची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्यांच्या आरक्षणास आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून, लाखो गणेशभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार असून, त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनसाठी ६० दिवस आधीच आरक्षण खुलं करण्यात आलं आहे. विशेषतः २२, २३ आणि २४ ऑगस्ट या शुक्रवार, शनिवार आणि रविवारसाठी मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांची तिकीट बुकिंग आजपासून टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे.
आरक्षण वेळापत्रक :
२२ ऑगस्ट २०२५ साठी आरक्षण : २३ जूनपासून सुरु
२३ ऑगस्ट २०२५ साठी आरक्षण : २४ जूनपासून सुरु
२४ आणि २५ ऑगस्ट २०२५ साठी आरक्षण : २६ आणि २७ जूनपासून सुरु
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या तारखेप्रमाणे तिकीट बुकिंग करावे. उदाहरणार्थ, २६ ऑगस्टला कल्याणहून खेड, चिपळूण किंवा कणकवलीला प्रवास करायचा असल्यास, तिकीट बुकिंग २६ जूनपासून सुरु होईल.
तिकीट बुकिंगसाठी महत्त्वाच्या सूचना :
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे तिकीट अत्यंत जलद भरतात. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी चाकरमान्यांनी शक्य तितक्या लवकर आपले तिकीट आरक्षित करावे, असा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती आगमनासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी परत जातात. त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले जाते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे अनेकांना जागा मिळणे कठीण जाते. म्हणूनच या वर्षी वेळेवर आरक्षण करून गणेशभक्तांनी आपल्या उत्सवाच्या आनंदात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.