
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील NEET चाचणीत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून एका वडिलांनी आपल्या १७ वर्षांच्या लेकीला लाकडी खुंट्याने अमानुषपणे मारहाण केली. रात्रभर वेदनेनं विव्हळणाऱ्या मुलीकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या दिवशी ते योग दिन कार्यक्रमासाठी शाळेत गेले. या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला असून, मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
मारहाणीचं कारण – ‘नीट’च्या गुणांची निराशा
साधना धोंडीराम भोसले (वय १७) ही बारावीच्या वर्गात शिकत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वीच ती NEET सराव परीक्षेसाठी दिलेल्या चाचणीचा निकाल समजल्यावर कमी गुण मिळाल्यामुळे वडील संतापले. शुक्रवार रात्री ९.३० वाजता त्यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनावर अमानुषपणे हल्ला चढवला.
‘तुम्ही कलेक्टर झालात का?’ – साधनाचे संतप्त उत्तर
मारहाणीच्या दरम्यान साधनाने वडिलांना सुनावले होते, “पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? तुमचेही कमी मार्क्स आले होते ना?” या उत्तरामुळे भोसले आणखीनच चिडले आणि त्यांनी तिला आक्रमकपणे मारहाण केली, असे तपासात समोर आले आहे.
मुलगी विव्हळत होती, वडील मात्र योग दिन साजरा करत होते
संपूर्ण रात्री अत्यवस्थ अवस्थेत असलेली साधना सकाळपर्यंत विव्हळत होती. मात्र वडील, धोंडीराम भोसले हे कोणतीही वैद्यकीय मदत न घेता योग दिनासाठी शाळेत रवाना झाले. दुपारी घरी परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू आधीच झाल्याचे स्पष्ट केले.
आईने पोलिसांत धाव घेतली, आरोपी वडील अटकेत
घटनेनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रविवारी आरोपी धोंडीराम भोसले यांना अटक केली. ते गावातील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
संपूर्ण राज्यात हळहळ; शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलीचा दुर्दैवी अंत
साधना ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. दहावीमध्ये तिने ९५ टक्के गुण मिळवले होते. वडिलांच्या अमानुष वागणुकीमुळे एका चमकत्या भविष्यास कालांतराने काळोख प्राप्त झाला. सांगली जिल्ह्यासह राज्यभरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षणाच्या दबावात गुदमरलेलं स्वप्न, आणि जबाबदार ठरलेले वडील, हे वास्तव समाजाला अंतर्मुख करणारे आहे.