
मुंबई प्रतिनिधी
मराठी मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. झगमगत्या दुनियेत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या तरुण अभिनेत्याने, तुषार घाडीगावकरने, आयुष्याचा शेवट केला आहे. काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून, सहकारी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून तुषारला श्रद्धांजली वाहत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता अंकुर वाढवे याने एका भावनिक पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. “मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात! आपण मार्ग काढला पाहिजे, पण आत्महत्या हा मार्ग नाही!” अशा शब्दांत त्याने मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया दिली.
तुषार घाडीगावकरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा हा तरुण रुपारेल महाविद्यालयात शिकत असताना नाट्य विभागात सक्रिय होता. नंतर त्याने मालिका, चित्रपट अशा माध्यमांतून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले.
‘लवंगी मिरची’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘मन कस्तुरी रे’, ‘हे मन बावरे’, ‘झोंबिवली’ या चित्रपटांत त्याने काम केलं होतं.
‘घाड्या’ या टोपणनावाने ओळखला जाणारा तुषार आपल्या मित्रपरिवारात अत्यंत लोकप्रिय होता. परंतु गेल्या काही काळात काम न मिळाल्याने तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता, अशी माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.
या घटनेमुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. तरुण, उमदा, प्रतिभावान अभिनेता अशा शब्दांत त्याच्या सहकलाकारांनी त्याचे स्मरण केले आहे.
कलाविश्वातील ही अपूरणीय हानी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.