
मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांत खासगीकरणाच्या हालचालींविरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला असून, या निर्णयांविरोधात ‘मनपा कामगार संघटना संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली मंगळवारी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालये आणि इतर विभागांचे खासगीकरण थांबवावे, या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. मोर्चादरम्यान पालिका आयुक्तांशी शिष्टमंडळाची चर्चा झाली, मात्र कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे संघटनांनी अधिक आक्रमक होत १ जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मोर्चानंतर संघर्ष समितीने २२ ते ३० जूनदरम्यान मुंबईतील सर्व परिमंडळांमध्ये निदर्शने होणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर १ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच दिवशी खासगीकरणासंबंधी निविदा मागे न घेतल्यास कामबंद आंदोलन छेडले जाईल.
महापालिकेच्या घनकचरा विभागात यापूर्वीही खासगीकरणाचा प्रयत्न झाला होता. मात्र, म्युनिसिपल मजदूर युनियनच्या आंदोलनामुळे तो प्रयत्न मागे घेण्यात आला होता. १९९१ साली झालेल्या करारानुसार कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम कंत्राटी पद्धतीने दिले जाणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. औद्योगिक कलह कायद्याअंतर्गत केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडूनच काम घेतले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
आजघडीला मुंबईतील बहुतांश वॉर्डांत सफाई कामे कंत्राटी पद्धतीने केली जात असून, केवळ तीनच वॉर्डांत पालिकेची स्वतःची वाहने व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
* कामगारांच्या प्रमुख मागण्या
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या खासगीकरणाच्या निविदा तत्काळ रद्द कराव्यात
महापालिकेच्या रुग्णालयांचे खासगीकरण त्वरित थांबवावे
कंत्राटी कामगारांना कायम करावे व रिक्त पदे तातडीने भरावीत
भरती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य द्यावे
लाड-पागे समितीच्या शिफारशींची पारदर्शक अंमलबजावणी करावी