
रायगड प्रतिनिधी
कोकणातील रायगड जिल्ह्यावर निसर्ग कोपल्यासारखा पावसाचा जबरदस्त तडाखा बसत आहे. काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड, नागोठणे, महाड, रोहा, अलिबाग आदी शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, पाणी खेड शहरात घुसले आहे.
खेड येथील जगबुडी नदीचं पाणी थेट मटण मार्केटमध्ये शिरले असून, बाजारपेठ धोक्याच्या झोनमध्ये आली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खेड शहरात नारंगी नदीसह अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
नागोठण्यात घरात शिरलं पाणी, रस्त्यावर उतरल्या बोटी
घाटमाथ्यावरील मुसळधार पावसाचा फटका नागोठणे शहराला बसला असून, येथे रस्ते जलमय झाले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास नागोठणे शहर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने बचावासाठी बोटी रस्त्यावर उतरवल्या आहेत. नागोठणेतील आंबा नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे.
शाळांना सुट्टी, वाहतुकीवर परिणाम
पूरस्थिती लक्षात घेता, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुंडलिका, पाताळगंगा आणि आंबा नद्यांनी धोक्याची किंवा इशारा पातळी ओलांडली आहे.
पाली-खोपोली मार्ग बंद, वाहतुकीस अडथळा
पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली-खोपोली रोडवरील उन्हेरे फाटा येथील पूल पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तासह दोन्ही बाजूंनी बॅरेगेट्स लावण्यात आले आहेत. सुधागड तालुक्यातील भेराव गावाकडे जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन सज्ज
जिल्हा प्रशासन, पोलीस, नगरपरिषदा आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी सतर्कता बाळगली आहे. नागरिकांना अनावश्यक कारणांमुळे घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमारांनाही समुद्राकाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.