
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई | मुंबईतील जाहिरात फलक माफियांनी पुन्हा एकदा आपल्या हव्यासासाठी पर्यावरणाचा बळी घेतल्याची संतापजनक घटना वांद्रे पूर्व येथील मराठा कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे. अधिक ‘व्हिजिबिलिटी’ मिळवण्यासाठी येथे तीन प्राचीन वृक्षांना विष देण्यात आले असून, त्यानंतर काही दिवसांत हे वृक्ष सुकून कोसळले आहेत.
या संपूर्ण प्रकारामागे ‘एमएस रोशन स्पेसेस’ आणि ‘पायोनियर अॅडव्हर्टायजिंग’ या जाहिरात कंपन्यांचा थेट हात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली, तरी अद्याप या प्रकरणी एकाही संबंधितावर FIR दाखल करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगत आहेत.
“फक्त वांद्रे नव्हे, तर संपूर्ण ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे परिसरात मागील वर्षभरात १० ते १५ वृक्ष बेकायदेशीररीत्या नष्ट करण्यात आले आहेत,” अशी माहिती स्थानिक आमदार वरूण सरदेसाई यांनी दिली. त्यांनी म्हटले की, “महापालिकेने पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल न होणे हे अतिशय संशयास्पद आहे.”
सरदेसाई पुढे म्हणाले, “ह्या कंपन्यांचे मालक कोणीही असोत, त्यांनी पर्यावरणाचा केलेला विध्वंस माफ करता येणार नाही. मागील अधिवेशनात मी हा मुद्दा मांडला होता आणि आगामी अधिवेशनातही सरकारला जाब विचारणार आहे.”
मुंबईसारख्या शहरात असे किती प्राचीन वटवृक्ष आणि इतर वृक्ष जाहिरात फलकांच्या हव्यासात नष्ट झाले आहेत याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र वांद्रेतील या प्रकारानंतर नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या वृक्षहत्येच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.