
मुंबई प्रतिनिधी
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) वांद्रे येथील मुख्य कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रे पूर्व गौतम नगर येथील काही पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या अभियानात एसआरएने सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला असल्याबद्दल प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नवीन गृहनिर्माण धोरणानुसार राज्यात ३५ हजार घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, या योजनेची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी एसआरए प्राधिकरणावर असेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. सामान्य नागरिकांचे ‘घराचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, आमदार दिलीप लांडे, शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर, राजीव वजाळे, शिवसेना पदाधिकारी, एसआरए प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.