
ठाणे प्रतिनिधी
ठाणे अँटी नारकोटिक्स सेलने अखेर कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी नीलोफरला अटक केली आहे. बांद्रा येथील ही महिला ड्रग्स माफिया गेल्या काही महिन्यांपासून फरार होती. मात्र, नीलोफरच्या अटकेनंतरही तिची साथीदार रुबीना अजूनही बांद्रा पश्चिमेतील दरगाह गली, म्हाडा ग्राउंड परिसरात एमडी ड्रग्सचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नीलोफर आणि रुबीना यांच्यावर यापूर्वीच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि मुंबई अँटी नारकोटिक्स सेलने विविध गुन्ह्यांप्रकरणी केस दाखल केल्या आहेत. सध्या त्या काही प्रकरणांत जामिनावर बाहेर आहेत.
१२ फेब्रुवारी रोजी ठाण्यात मोठी कारवाई
१२ फेब्रुवारीला ठाण्यातील ठाकुरपाडा येथील चेतन अपार्टमेंटमध्ये रूम नंबर २०२ वर ठाणे अँटी नारकोटिक्स सेलचे वरिष्ठ अधिकारी राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. या छाप्यात इलियास खान, अमन खान आणि सैफ अली खान या तिघांना अडीच किलो एमडी ड्रग्स (किंमत सुमारे २.५ कोटी रुपये) सह अटक करण्यात आली होती. हे ड्रग्स राजस्थानमधून आणण्यात आले होते. ही खोली नीलोफरची होती आणि सैफ अली तिचा नातेवाईक असल्याचे उघड झाले.
त्यावेळी नीलोफर घटनास्थळी उपस्थित नव्हती आणि त्यानंतर ती फरार झाली होती. पोलिसांनी तिचा सातत्याने शोध घेतला आणि शेवटी तिला विक्रोळी येथून अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नीलोफर सतत ठिकाणं बदलत होती आणि मोबाईलदेखील फार कमी वेळासाठी चालू करत होती.
कॅन्सरचा असल्याचा दावा?
नीलोफरला अटक केल्यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आता नीलोफर कोर्टात दावा करत आहे की तिला कॅन्सर आहे आणि तिच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पोलिसांना संशय आहे की ही वैद्यकीय माहिती खोटी असू शकते आणि केवळ जामिनासाठीच हा डाव रचला गेला असावा. त्यामुळे पोलिस आता तिच्या वैद्यकीय फाईल्सची चौकशी करत आहेत.
रुबीना अजूनही सक्रिय – पोलिसांनी लक्ष देण्याची गरज
नीलोफरला अटक झाली असली तरी तिची साथीदार रुबीना अजूनही बांद्र्यात एमडी ड्रग्स विक्री करत असल्याचे माहितीदारांकडून समजते. दरगाह गली, म्हाडा ग्राउंड परिसरात तिचे वर्कर खुलेआम ड्रग्स विक्री करत असल्याचे आरोप आहेत. जर बांद्रा पोलिस आणि जुहू अँटी टेररिस्ट स्क्वॉड यांनी वेळेत कारवाई केली, तर रुबीना आणि तिच्या टोळीला अटक करून हा ड्रग नेटवर्क मोडून काढता येईल.असे बोलले जाते.
मुंबईत दररोज हजारो कॉलेज युवक एमडी ड्रग्सच्या आहारी जात आहेत, त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पोलिस प्रशासनाने आता तातडीने पावले उचलून बांद्र्यातील ड्रग्ज नेटवर्क कायमचे संपवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.