
सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वरच्या एका जुन्या विहिरीतून ब्रिटिश राजवटीपासून लपवलेली ऐतिहासिक शस्त्रे सापडल्याची घटना समोर आली आहे. या शस्त्रांमध्ये मराठा धोप प्रकारच्या तलवारींचा समावेश आहे, ज्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केला जात होता.
या तलवारी दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
या शोधामागे इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे आणि स्थानिक जाणकार राहुल कदम यांचे योगदान आहे. त्यांनी ३ मे २०२५ रोजी विहिरीत तलवारीची मूठ आणि इतर पुरातन वस्तू आढळून दिल्या. या वस्तूंची पाहणी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली आणि त्यानंतर त्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आल्या. या तलवारींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पाते फ्रेंच आणि पोर्तुगीज बनावटीचे असून, त्यांना ‘फिरंगी’ असेही म्हटले जाते. या तलवारींचा वापर मराठा सैन्याने युद्धात केला जात असे. या शस्त्रांचा शोध लागल्यामुळे मराठा इतिहासाच्या अभ्यासाला नवीन दिशा मिळू शकते.
या ऐतिहासिक शोधामुळे महाबळेश्वरच्या सांस्कृतिक वारशाला नवीन ओळख मिळाली आहे. या प्रकारच्या घटनांमुळे स्थानिक इतिहासाच्या अभ्यासाला चालना मिळते आणि भविष्यातील संशोधनासाठी नवीन दारे उघडतात. या शोधामुळे महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक महत्त्वाला अधोरेखित करण्यात आले आहे.