
मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये भारताच्या विवीध भागातून लोक उपचार घेण्यासाठी येत असतात.विवीध भाषेची व अनेक धर्माची लोक या मुंबई मधील टाटा रुग्णालयाच्या परिसरात आपल्या पेशंटच्या उपचारासाठी धावपळ करत असतात.व रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलच्या आसपासच्या परीसरात आडोशाला राहण्याची सोयी करून फुटपाथवर रात्रीचे झोपून दिवस काढत असतात.व काही सामाजिक संस्था या टाटा हॉस्पिटल मधील रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक वर्षे जेवणाची व्यवस्थाही करताना दिसतात.परंतु याच जेवण देण्यावरून एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होतोय.
मुंबईतील टाटा रुग्णालयाबाहेरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लोकांना अन्न वाटप करताना दिसत आहे. अन्न वाटप करणाऱ्या व्यक्तीवर अन्न वाटप करताना लोकांना जय श्री राम म्हणण्यास सांगितल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला जेवण वाटप करणारी व्यक्ती घोषणा देण्यास सांगत असल्याचे म्हणत आहे. घोषणा न दिल्याने जेवणही दिले नसल्याचे महिलेने सांगितले.
कथित व्हिडिओमध्ये जेवण वाढणाऱ्या वृद्धाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये काही लोक असे म्हणतानाही दिसत आहेत की, जेवण द्यायचे नसेल तर देऊ नका पण अशा प्रकारे जबरदस्तीने घोषणा देण्यास सांगता येणार नाही. व्हिडिओ काढणारी व्यक्ती तिथे उभ्या असलेल्या लोकांना विचारत आहे की त्यांनी जय श्री रामची घोषणा दिली आहे का?. यावर बरेच लोक असं बोलण्यात यात काही नुकसान नसल्याचे म्हणत आणि आम्ही हे केले आहे, असं म्हणत आहेत.
अशातच हॉस्पिटलमधील लोक भेदभाव करत नाहीत, तर जेवण देणारे असे का करत आहेत, असा प्रश्न एका व्यक्तीने विचारले. तुम्ही लोक अन्न वाटायला आला आहात, अन्न वाटप करून जा, असं त्या व्यक्तीने म्हटलं. त्यावर जेवण वाढणाऱ्या वृद्ध व्यक्तीने पुन्हा जय श्री राम म्हणाल तर खायला मिळेल, जास्त फालतू बोलू नका, असं म्हटलं. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने वृद्धाला भडकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी शांतपणे जेवणाचे वाटप सुरु ठेवले.
दुसरीकडे, चेहरा झाकलेल्या महिलेने सांगितले की, जेवण वाटप करणाऱ्या व्यक्तीने तिला जय श्री राम म्हणायला सांगितले. जेव्हा मी तसे केले नाही तेव्हा त्याने जेवण देण्यास नकार दिला. वृद्धाने पीडित महिलेला दहशतवादी म्हटल्याचा आरोप काही लोकांनी केला. मात्र यावर वृद्ध व्यक्तीने स्पष्टपणे नकार दिला आणि आपण फक्त भगवान श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितले आणि कोणालाही दहशतवादी म्हटले नाही. मला माहित आहे की दहशतवादी काय असतो. ही भगवान श्रीरामाची भूमी आहे आणि जयश्रीराम म्हणण्यात काय गैर आहे, असे वृद्धाने म्हटलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि काँग्रेस अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनीही या वादात उडी घेतली आहे. जेवायला घालून घोषणा देण्यास सांगणाऱ्यांना पुण कसं मिळणार आहे. अशा मानसिकतेवर समाजाने जाहीर बहिष्कार टाकला पाहिजे, असं इम्रान प्रतापगढी यांनी म्हटलं आहे.