
सातारा प्रतिनिधी
पोलीस व्हॅन रस्ता क्रॉस करत असताना कार चालकास गाडी थोडी मागे घे म्हटल्याच्या कारणावरून पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ करत मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
कराड शहराजवळील मलकापूर येथे पोलीस आणि कारचालकाच्या झालेल्या वादावादीचं रूपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झालं. कारचालकासह त्याच्या पत्नीने आणि अन्य दोघांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा प्रकार सुरू असताना काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
मारहाण करणाऱ्या कारचालकाचं नाव शुभम अरुण भोसले (रा.कोल्हापूर) असं असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव ब्रह्मादेव माने असं आहे. पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मदेव माने यांनी कारचालकास गाडी थोडी मागे घेण्यासाठी सांगितल्याने पोलीस कॉन्स्टेबलला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन ‘रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, मी गाडी मागे घेत नसतो’, असं म्हणाला.
कारचालक शुभम अरुण भोसले याने खाली उतरुन ‘तू पुढे कसा जातोस ते बघतोच’, असं म्हणून पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली, आणि पुन्हा गाडीत बसत असताना कार चालक शुभम अरुण भोसलेची पत्नी आणि गर्दीतील दोन अनोळखी इसम यांनी कॉन्स्टेबलचा हात धरुन गाडीतून खाली खेचत हात पिरगळला त्यावेळी कारचालक शुभम भोसले आणि त्याच्या पत्नीने डोक्यावर, कानावर हाताने मारहाण केल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणून मारहाण करुन दुखापत केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबलने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.