
सातारा प्रतिनिधी
सातारा शहरातील पोवई नाका येथील भाजी मंडईतील शेतकऱ्यांच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याविषयी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला रितसर या बाबतचा लेखी तक्रारी होती.
त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या व्यापारांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या एका व्यापाऱ्याने चक्क पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिली. “तुला गोळ्या घालतो” अशा शब्दात त्याने माजोरडेपणाने ही धमकी दिली, त्यामुळे साताऱ्यात मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील रविवार पेठेत असलेल्या पोवई नाका भाजी मंडईमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये बसण्याच्या जागेवरुन नेहमीच वाद होत असतात. भाजी मंडईची डावी बाजू आणि तेथील दोन रांगा शेतकऱ्यांसाठी आरक्षित आहेत. पण गेल्या काही काळापासून या जागेवर दोन छोट्या टपऱ्यांनी अतिक्रमण केलं. याच घटनेची दखल घेत काही शेतकऱ्यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर शेळके यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिली.व्यापाऱ्यांकडून या लाईन मध्येच अतिक्रमण केले जात असल्यामुळे मंडईमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याबाबत सांगत होते .
“पोलिसांच्या समोरच दिली धमकी”
ही तक्रार आल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम आणि पालिकेच्या कर्मचार्यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न सुरू केला. शेतकऱ्यांची जागा मोकळी करून देण्यात आली. पण तेथील एका व्यापाऱ्याने वाद घालण्यास सुरूवात केली. नीट बोलायचं नाहीतर कापून टाकेन एकेकाला, गोळ्याच घालेन तुला अशा स्वरूपात त्या व्यापाऱ्याने सर्वांसमोरच शेतकरी संघटनेच्या नेत्याला थेट धमकी दिली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्याने पोलिसांच्या समोरच ही थेट धमकी दिली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला. मात्र तेव्हा पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. खाकी वर्दी धारकांसमोरच थेट एखाद्याला संपवण्याची भाषा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या संबंधित व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आणि सामान्य नागरिकांकडूनही करण्यात आली आहे.