
मुंबई प्रतिनिधी
नागरिकांचे सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेले १.४९ कोटी रुपये अवघ्या २४ तासात वाचविण्यात १९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई पथकास यश
बृहन्मुंबई महानगरात दिवसेंदिवस वाढणारे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण व त्या मार्फत नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक यासंदर्भातील तक्रारी वाढत आहेत. याबाबत नागरिकांना तक्रार नोंदविणे सोयीस्कर होण्यासाठी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
याद्वारे सायबर गुन्ह्यात आर्थिक फसवणूक झालेले तक्रारदार यांनी फसवणूक झाल्यानंतर १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास, पोलिसांद्वारे संबंधित बँक व इतर नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ समन्वय साधून फसवणूक झालेली रक्कम बँक खात्यांवर गोठविण्यात येते.
दिनांक २१/०३/२०२५ रोजी १९३० सायबर हेल्पलाईनवर प्राप्त विविध तक्रारींपैकी ११० तक्रारींची नोंद NCCRP पोर्टलवर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वे इन्वेस्टमेंट फ्रॉड, शेअर ट्रेडिंग फ्रॉड, सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन शॉपिंग फ्रॉड, व्हॉट्सअॅपवर बनावट प्रोफाईल तयार करून पैशांची मागणी करणे अशा ऑनलाईन सायबर गुन्ह्यांत नागरिकांची फसवणूक झाली होती.
या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करत, फसवणूक झालेल्या रकमेपैकी रुपये १,४९,८७,३७६/- (अक्षरी – एक कोटी एकोणपन्नास लाख सत्याऐंशी हजार तीनशे शहात्तर रुपये) विविध बँक खात्यांवर मागील २४ तासांत होल्ड करून वाचवण्यात मुंबई १९३० सायबर हेल्पलाईन पथकास यश आले आहे.
या कार्यवाहीत पो.उ.नि. मंगेश भोर, पो.ह.वा. अभिजीत राऊळ, म.पो.ह.वा. प्राजंल वालावलकर, पो.शि.किरण पाटील, म.पो.शि. सोनाली काकड यांनी NCRP पोर्टलवर तक्रार दाखल करून संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे तक्रारदारांची फसवणूक झालेली रक्कम विविध बँक खात्यांवर होल्ड करण्यात यश आले.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सायबर गुन्ह्यात आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधावा, जेणेकरून फसवणूक झालेली संपूर्ण किंवा जास्तीत जास्त रक्कम वाचविणे शक्य होईल.