
मुंबई प्रतिनिधी
पुर्ण वैमनस्यातून मुंबईतील बोरिवली भागात एका व्यक्तीवर धार, धार कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बोरिवली पश्चिम येथील लोटस एसआरए सोसायटीमध्ये मंगेश गासप्पा हा 29 वर्षांच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.
मंगेशवर हल्ला करणारे आरोपी आकाश शिंदे आणि गणेश कांबळे हे मंगेशचे नातेवाईक असून तेही याच भागात राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गासप्पा आणि शिंदे हे एकेकाळी मित्र होते, मात्र दीड वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. तेव्हापासून शिंदेने बदला घेण्याचा कट रचला.
गुरूवारी मंगेश गासप्पा होळीच्या पूजेला उपस्थित राहून काही लोकांशी गप्पा मारत होते, तेव्हा शिंदे मागून गासप्पाच्याजवळ आला आणि गळ्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गासप्पाला गंभीर दुखापत झाली, तसंच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. यानंतर मंगेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मंगेश गासप्पा याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आकाश शिंदे आणि गणेश कांबळे याला अटक केली आहे. आकाश शिंदे आणि मंगेश गासप्पा यांच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. मंगेश गासप्पा गोराई येथे राहतात, तर शिंदे पालघर जिल्ह्यातील नायगावमध्ये राहतो. आकाश शिंदे हा सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.