
मुंबई प्रतिनिधी
38 दिवसांच्या अपहरण झालेल्या बाळाची मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईल सुटका केली आहे. वनराई पोलिसांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमाने 38 दिवसांच्या बाळाच्या अपहरणाची उकल केली आहे.
प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील बस डेपोजवळ 2 मार्चच्या रात्री 38 दिवसांच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं होतं.
बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार मिळताच वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या 38 दिवसांच्या मुलाचे विकण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचं तपासात उघड झालं. वनराई पोलिसांनी अनेक पथके तयार करून वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि पोलीस सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी सुमारे 11,000 रिक्षांची तपासणी केली असता पोलिसांना पिवळे जॅकेट घातलेला एक आरोपी मुलाला रिक्षातून जाताना आढळून आला. पोलिसांनी 1 लाख मोबाईल नंबर तपासत असताना आरोपी केमळवणीत असल्याची माहिती मिळाली.
वनराई पोलिसांनी मालवणीमध्ये सापळा रचून पिवळे जॅकेट घातलेल्या आरोपीला अटक केली. पुढील तपासात आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 38 दिवसांच्या बाळाला सुखरुप वाचवण्यात आले आहे. या 38 दिवसांच्या मुलाला विकण्याचा आरोपींचा मुख्य उद्देश होता.
मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान (42), फातिमा जिलानी शेख (33), राजू भानुदास मोरे (47), मंगल राजू मोरे (35) अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्वजण मालवणीयेथील रहिवासी आहेत. आरोपी मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान याने फातिमा जिलानी शेख यांना 5 लाख रुपयात मुल विकत घ्यायला सांगितले, त्यानंतर फातिमा जिलानी शेखने तिचा रिक्षा चालक पती राजू मोरे याला मुल चोरायला सांगितलं, त्यानंतर आरोपींनी मुलाला पळवलं. वनराई पोलिसांच्या 6 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.