
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील भररस्त्यात अश्लिल कृत्य करत असतानाचा प्रकार ताजा असताना दुसरीकडे निवृत्त पोलीस अधिकार्याला धारदार हत्याराने मारहाण करुन घरात शिरुन टोळक्याने तोडफोड केली.
तलवार नाचवत परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार समोर आला आहे. निवृत्त पोलिसांनाही जीव मुठीत धरुन जगावे लागत असले तर सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी गोरखनाथ एकनाथ शिर्के (वय ६५, रा. फॉरेस्ट पार्क, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गोविंद हनुमंत कॅनल, त्याची पत्नी, मयुर सकट (रा. येरवडा),राजू देवकर, कार्तिक राजू देवकर याची दोन मुले व येरवडा येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फॉरेस्ट पार्क येथे रविवारी दुपारी दीड वाजता घडला.
गोरखनाथ शिर्के निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी पुणे शहरातील बंडगार्डन, चतु:श्रृंगीसह विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी फॉरेस्ट पार्कमध्ये घर बांधले. त्यांची दोन मुले बाहेर भाड्याने राहतात. त्यामुळे त्यांनी घरावर मजला बांधण्याचा निर्णय घेतला. फॉरेस्ट पार्कमध्ये प्रत्येकाने जमीन घेऊन आपल्या ऐपतीनुसार घरे बांधली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद कॅनल याच्याकडे हाऊसकिपिंगचे कंत्राट आहे. फॉरेस्ट पार्क मधील सार्वजनिक रोडवरील ड्रेनेजचे झाकण तुटलेले होते. शिर्के यांच्याकडे येणार्या वाहनांमुळे ते तुटले असा आरोप गोविंद कॅनल याने केला व ते दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. हे ड्रेनेजचे झाकण अगोदरच तुटले असल्याचे सोसायटीतील काही लोकांचे म्हणणे आहे. पण, गोविंद कॅनल याच्या दहशतीमुळे कोणी बोलत नाही. शिर्के यांनी हे झाकण बदलण्यासाठी लागणारी रिंग आणून दिली आहे.
असे असताना त्याचा सर्व खर्च शिर्के यांनी करावा, त्याचे पैसे द्यावेत, यासाठी गोविंद कॅनल हा आपल्या नातेवाईकांना घेऊन शिर्के यांच्या घरी आला. त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर येरवडा येथील मुलांना बोलावले. ती मुले आल्यावर सर्व जण घरात शिरले. गोविंद कॅनल याने तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. घराच्या पार्किंगमध्ये ठेवलेलया खुर्च्या व कुंड्यांची तोडफोड केली. घरात शिरुन घरातील सामानाचे नुकसान केले.विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करीत आहेत.