
पुणे प्रतिनिधी
आमचं पाणी बंद केलं, शौचालय तोडलं, मारहाण करत जातीवाचक शिव्या दिल्या.
आमचे कोणी ऐकत नाही. अशी खंत
पिंपरी चिंचवडमधील महिलांची फरपट सुरू आहे.
सध्या या महिला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर पायी चालत मुंबईहून पुण्याकडे निघाल्या आहेत.
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून जाणारं हे कुटुंब पिंपरी चिंचवडच्या थेरगावचं आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबामध्ये कोणीही कर्ता पुरुष नाही.
तीन बहिणी आणि एक लहान मुलगा-मुलगी असे पाच जण हातात बॅनर घेऊन सकाळपासून रात्रीपर्यंत पायपीट करत आहेत. अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी पिंपरी चिंचवडहून मंत्रालयापर्यंत जे जाणार आहेत.
त्यांच्यावर अनेक प्रकारचा अन्याय झाल्याचं हे कुटुंबीय सांगत आहेत. पोलीस, प्रशासनावर त्यांनी आरोप केले आहेत. तर प्रशासन आणि पोलिसांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत. उलट या कुटुंबानं अतिक्रमण केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
हाती असलेल्या बॅनरद्वारे त्यांच्यावर झालेला अन्याय मांडण्याचा प्रयत्न या कुटुंबानं केला आहे. ते पाहून लोकही हळहळ व्यक्त करत आहेत.
दोन वर्षांत झालेली मारहाण, शेजाऱ्यांकडून झालेली शिवीगाळ आणि जागेबाबत न्याय मिळण्याची त्यांची मागणी आहे.
पोलीस आणि पालिकेकडून दोन वर्षांपासून न्याय मिळत नसल्यानं मुख्यमंत्र्यांकडं न्यायाची मागणी करण्यासाठी या महिला पायी निघाल्या आहेत.
या प्रवासादरम्यान बीबीसी मराठीच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी संपर्क साधला आणि हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रकरण काय आहे?
सोनम लोंढे त्यांच्या दोन मोठ्या बहिणी आणि दोन मुलांसह काही वर्षांपासून थेरगावमधील बापूजी बुवा नगर इथं राहतात. आई-वडील होते तेव्हापासून म्हणजे 50 ते 60 वर्षापासून हे त्यांचं घर असल्याचं त्या सांगतात.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील या घराच्या आजुबाजूची काही जमीन नखाते कुटुंबीयांची आहे. ती नखाते यांनी काही वर्षांपूर्वी विकासकांना विकली होती.
सोनम लोंढे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “दोन वर्षापासून आम्हाला घरात घुसून मारहाण, जातीवरून शिव्या असा त्रास दिला जातो. आम्ही वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी आमची तक्रार घेत नाही.