
सातारा प्रतिनिधी
राज्य शासनाकडून सध्या पोलिसांच्या वसाहती आणि पोलीस कार्यालयांच्या इमारती नव्याने व अत्याधुनिक पद्धतीने
बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कार्यालयांच्या इमारतीचे भूमीपूजन केले.
मात्र, गेल्या दीड वर्षांपासून धुळखात पडून असलेल्या साताऱ्यातील पोलीस कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीचे उद्घाटन कधी होणार, असा सवाल पोलिसांच्या कुटुंबीयांना पडलेला आहे. जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी शेकडो कोटी खर्च करून मोठी प्रशस्त अशी पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी या वसाहतीचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. तब्बल 700 कर्मचाऱ्यांसाठी आणि 100 अधिकारी यांना राहण्यासाठी ही वसाहत बांधण्यात आली आहे. मात्र, उद्घाटन केलं नसल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येथे राहण्यासाठी जाता येत नसल्याने ही प्रशस्त अशी वसाहत धुळखात पडली आहे.
नव्या इमारतीत जाता येत नसल्याचे जुन्याच वसाहतीत पोलीस कुटुंबीयांचा संसार सध्या सुरू आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या वसाहतीचे उद्घाटन कधी होणार, आम्ही कधी तेथे राहण्यासाठी येणार अशी भावनिक साद पोलीस पत्नींनी व्यक्त केली आहे.
लवकरात लवकर उद्घाटन करावे
साताऱ्यातील पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंब सध्या जुन्या पोलीस लाईनमध्ये राहत आहेत. या पोलीस लाईनमधील घरांची दुरवस्था झालेली आहे. घरांच्या कौलांची पडझड, भिंतींना पडलेल्या भेगा, लाइट्स, ड्रेनेज पाणी, पोलीस लाईन शेजारी असणाऱ्या उघड्या नाल्याचा वास तसेच उघड्यावर टाकत असलेला कचरा, यांसारख्या समस्यांचा नाहक त्रास पोलीस कुटुंबीयांना होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी व प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर ही नव्याने बांधण्यात आलेली वसाहत सुरू करण्यात यावी, अशी मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे.