
सातारा प्रतिनिधी
शुक्रवार पेठेतील श्री कोटेश्वर शिवमंदिराचा ‘वार्षिक उत्सव’ माघ शुक्ल एकादशी ते माघ शुक्ल पौर्णिमा म्हणजे ८ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी श्री.संतोष गुरव यांनी दिली.
या कालावधीत महामृत्यूंजय यज्ञ, लघुरुद्र, भजन, सत्यनारायणा पूजा असे विविध कार्यक्रम आणि महाप्रसाद यांचे आयोजन श्री कोटेश्वर शिवमंदिरामध्येच होणार आहे. ज्या शिवभक्तांना उत्सवासाठी देणगी द्यायची आहे, त्यांनी पुजारी श्री. संतोष गुरव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीमध्ये सनई-चौघडा वादन, भजन, तसेच वसंत पूजन आणि मंत्र जागर होणार आहे. या वेळी रसपानाचेही आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत महामृत्यूंजय यज्ञ, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पंचाक्षरी मंत्रपठण, सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत भजन होणार आहे. १० फेब्रुवारी या दिवशी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत लघुरुद्र, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत मंत्रपठण, दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत भजन आणि रुद्रस्वाहाकार होणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत महाआरती होणार आहे. ११ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत नवग्रह शिवयाग होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत भावगीतांचा कार्यक्रम होईल. १२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ ते १० या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा होईल. दुपारी १२ ते ३.३० या वेळेत महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.