
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील मुळशीच्या पृथ्वीराज मोहोळ यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. पृथ्वीराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर दोन विरुद्ध एक गुणांनी विजय मिळवला आहे.
अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या या कुस्तीच्या अंतिम सामन्यात शेवटचे सहा सेकंद उरलेले असताना महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं. त्यानंतर पंचानी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. आयोजकांकडून पृथ्वीराजला थार गाडीही बक्षीस देण्यात आली.
पृथ्वीराज मोहोळने मुळशी तालुका निवड चाचणीपासूनच कोणत्याही प्रतिस्पर्धी मल्लाला कमी न लेखण्याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे तालुका स्तरापासून ते जिल्हा व राज्यस्तरावरील महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सर्व कुस्त्या त्याने दहा विरु्दध शून्य अशा मोठ्या गुणांच्या फरकाने जिंकलेल्या आहेत. राज्यस्तरावरील महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य सामन्यात मात्र त्याने कमाल करून प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला ढाक या डावावर चितपट केले आहे.
यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला पृथ्वीराज हा त्याचे आजोबा अमृता मोहोळ यांचा नातू आहे. अमृता मोहोळ यांनीही महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे. आजोबानंतर नातवाने महाराष्ट्र केसरीची गदा मिळविल्यामुळे एकाच घरात दोन महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्या आहेत. मुठा गाव हे मामासाहेब मोहोळ यांचे गाव असून मामासाहेबांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केलेली आहे. त्याच मामासाहेबांच्याच गावकी आणि भावकीतील असलेला पृथ्वीराज याने या महाराष्ट्र केसरीच्या गदेवर नाव कोरले आहे.
पृथ्वीराजचे आजोबा अमृता मोहोळ यांनी १०९० साली वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती सामन्यात सतीश मांडियाचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळविलेला आहे. पृथ्वीराजचे वडील राजेंद्र मोहोळ यांना १९९९ साली नागपूर येथे झालेल्या उपांत्य सामन्यात माती विभागात पराभूत व्हावे लागले होते.
पृथ्वीराजचा चुलता सचिन मोहोळ यांनाही गोंदिया येथे झालेल्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पृथ्वीराजचा दुसरा चुलता सागर मोहोळ यांना बालेवाडी येथी सामन्यात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा ही कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते. पृथ्वीराजचे आजोबा अमृता मोहोळ यांच्यानंतर वडील राजेंद्र तसेच सचिन व सागर या दोन चुलत्यांच्या पराभवाचा सल यावेळी दूर करण्यात पृथ्वीराज मोहोळला यश आले आहे.