पुणे प्रतिनिधी
भारतात वाहतूक कोंडीमध्ये तिसर्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाहेरून जाणार्या रिंग रोडचे काम फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे ४२ हजार कोटी रुपये खर्चून सहा मार्गिका असलेला १७० किलोमीटर लांबीचा रिंगरोड पुढील अडीच वर्षात तयार करण्यात येणार आहे.
नाशिक, अहिल्यानगर , सोलापूर आणि सातारा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने ये – जा करणारी जड वाहने याच रिंगरोडवरून मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये येणार्या जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कात्रज – देहूरोड महामार्ग शहरातील वाहनांसाठी उपयोगात येणार असून याच मार्गालगत मेट्रो आणि बीआरटी असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून जाणाऱ्या रिंग रोडचे दोन भाग करण्यात आले असून, पश्चिमेकडील रस्ता ६९ किलोमीटरचा, तर पूर्वेकडील रस्ता १०१ किलोमीटरचा आहे. या दोनही रस्त्याचे बारा भाग तयार केले असून, त्याच्या कामाच्या बारा निविदा मंजूर करून वर्कऑर्डर देखील निघाल्या आहेत. ही सर्व कामे एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहेत. रिंगरोडसाठी पश्चिमेकडील ९९%, तर पूर्वेकडील ८६ टक्के भूसंपादन झाले आहे. हा रस्ता तयार करताना पंधरा ठिकाणी डोंगराखालून जाण्यासाठी बोगदे खणण्यात येणार आहेत. तसेच खडकवासला धरणाचे जलाशय आणि महत्त्वाचे रस्ते येथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी मोठे पूल देखील बांधण्यात येणार आहेत.
सातारा रस्त्याने येणारी वाहने खेड शिवापूर या भागातून पश्चिम रिंगरोडकडे वळणार आहेत. तेथून सिंहगड किल्ल्याच्या पलिकडील बाजूला डोंगरामध्ये मोठ्या बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामार्गे वाहने पुढे खडकवासला जलाशयात पाठीमागील बाजूला बांधलेल्या पुलावरून मार्गस्थ होतील. हिंजवडी आयटी पार्कच्या पलिकडील बाजूने ती वाहने पौड रस्ता ओलांडणार आहेत. तेथून ग्रामीण भागातून कुसगाव धरणाच्या मागील बाजूने वाहने पुणे – मुंबई मार्गावर उर्से येथे पोहचणार आहेत. तेथून पुढे ती मुंबईच्या दिशेने रवाना होतील. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना सात ते आठ किलोमीटर जास्तीचा प्रवास करावा लागणार आहे. मात्र, कोणत्याही अडथळ्याविषयी जड वाहने ये-जा करू शकतील.
सातारा रस्त्याने रिंगरोडने पूर्वेकडे जाताना वाहने सासवड-बोपदेव रस्ता, पंढरपूर रस्ता ओलांडून जाणार आहेत. नियोजित पुरंदर विमानतळाच्या अलीकडून वाहने सोलापूर रस्त्याच्या दिशेने जातील. तेथील ग्रामीण भागातून नगर रस्त्यावर लोणीकंद येथे रिंगरोड जोडला जाणार आहे. त्यानंतर आऴंदीच्या पलीकडील बाजूने रिंगरोड पिंपरी-चिंचवड मनपाजवळ नाशिक रस्त्यापाशी पोहचणार आहे. तळेगाव, चाकण, शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्यात जाण्यासाठी वाहनांना रिंगरोड उपयुक्त ठरणार आहे. नाशिक रस्त्यावरून मनपा आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीबाहेरून रिंगरोड पुणे -मुंबई रस्त्याकडे जाईल. सोलापूर, नगर, नाशिक रस्त्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत वाहतुकीच्या कोंडीतून जावे लागणार नाही. पूर्वेकडील रिंगरोडचा वापर या चार महामार्गाने येणाऱ्या वाहनांना लगतच्या जिल्ह्यात जाण्यासाठीही होणार आहे.


