
सातारा:प्रतिनिधी
पर्यटन विभागातर्फे महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आज पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आढावा बैठक संपन्न झाली. या महोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा मा. ना. शंभूराज देसाई सादरीकरणाद्वारे याप्रसंगी घेतला. तसेच त्या अनुषंगाने त्यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या.
महाराष्ट्र पर्यटन महोत्सव एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव राज्यातील तसेच देशातील पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरणार असून अनेक सांस्कृतिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा यात समावेश असणार आहे. या महोत्सवादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे दिवसनिहाय वेळापत्रक तयार करावे, त्याचप्रमाणे हे कार्यक्रम महाबळेश्वरमधील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर आयोजित करावेत, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच या पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि महोत्सवाचे नियोजन काटेकोरपणे करावे, असे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.
या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटील, पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.