
सातारा:प्रतिनिधी
बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाईन पोलिसांनी एकसर (तज्ञता. वाई) येथे एका संशयित आरोपीस जेरबंद केले. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व देशी बनावटीची पिस्तूल असा एकूण एक लाख २० हजार रुपये किमतीचे दोन शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्याम पानेगावकर यांना खास बातमीदारांमार्फत माहिती मिळाली, की एकसर गावाच्या बस स्थानकाच्या परिसरात एक संशयित विनापरवाना शस्त्र कमरेला लावून फिरत आहे. या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांच्या पथकास सापळा रचून संशयितास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकसर येथे सापळा लावला असता, त्याठिकाणी एक जण संशयितरीत्या फिरताना दिसला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव असता त्याने राजेश शंकर सणस (सध्या रा. एकसर, ता. वाई) असे असल्याचे सांगितले.
तपास पथकातील अंमलदार अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेचे डावे बाजूस एक रिव्हॉल्व्हर, तसेच कमरेच्या मागे मध्यभागी पँटमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल खोचलेले दिसले. त्याची एक लाख २० हजार रुपये किमतीची दोन्ही शस्त्रे ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक श्याम पानेगावकर, तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलिस हवालदार अजित जाधव, पोलिस शिपाई नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड, धीरज नेवसे, विशाल शिंदे यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत.