मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारच्या गेल्या साडेसात वर्षांच्या कार्यकाळात मुंबईचा विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला असून, येत्या सात वर्षांत मुंबई पूर्णतः झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यासाठी सविस्तर कृती आराखडा (रोडमॅप) तयार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवली येथे आयोजित भाजप–शिवसेना (शिंदे) युतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या सभेदरम्यान मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीवर जोरदार टीका केली. “ही विकासाची युती नसून कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे,” असा आरोप त्यांनी केला. ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला दस्तऐवज हा ‘वचननामा’ नसून ‘वाचननामा’ असल्याची खोचक टिप्पणी करत, त्यातील आश्वासनांची जबाबदारी मांडणाऱ्यांनाच स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले.
मागील महापालिका निवडणुकीत दिलेल्या पाच आश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता झाली नसताना, २५ वर्षे सत्ता हातात असूनही पुन्हा त्याच घोषणा केल्या जात असल्याबद्दल फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला. “ठाकरे कधी विकासावर बोलले, ते दाखवा,” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी महायुती सरकार केवळ आश्वासन देत नाही, तर ती पूर्ण करून दाखवते, असा दावा केला.
गेल्या साडेसात वर्षांत महायुती सरकारने मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे नमूद करताना, देश-विदेशातून येणारे पाहुणे बदललेली मुंबई पाहून आश्चर्य व्यक्त करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. झोपडपट्टीवासीयांसह मुंबईकरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावण्यात आल्या असून, विविध विकास योजना प्रत्यक्षात उतरवण्यात सरकारला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला हक्काचे पक्के घर देण्याचे उद्दिष्ट ठेवून झोपडपट्टीमुक्त मुंबईचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या सात वर्षांत हे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा किनारपट्टी मार्ग उभारण्यात येत असून, हा मार्ग भाईंदरपर्यंत २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गाला पर्याय म्हणून गोरेगाव–नागोठाणे असा नवा मार्ग विकसित करण्यात येत असून, बोरीवली–ठाणे भुयारी मार्गामुळे अवघ्या १५ मिनिटांत ठाण्यात पोहोचणे शक्य होणार आहे.
याशिवाय, उपनगरीय रेल्वेच्या सर्व गाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, या गाड्यांचे भाडे सध्याच्या साध्या लोकलइतकेच ठेवण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


