मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने मतदानाआधीच आघाडी घेतली असून बिनविरोध निवडींच्या माध्यमातून विजयाचा ‘चौकार’ लगावला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे या तीन महापालिकांमध्ये मिळून भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी आणि आसावरी केदार नवरे या दोघी बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून रेखा चौधरी यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. तर प्रभाग क्रमांक २६ ‘क’ मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आसावरी नवरे यांचीही खुल्या प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली आहे.
पनवेल महापालिकेत प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून भाजपचे नितीन पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. अर्ज छाननीनंतर विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने हा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, धुळे महापालिकेतील घडामोडींनी राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी अर्ज छाननीच्या पूर्वसंध्येला पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी उज्वला भोसले यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली.
अर्ज छाननीदरम्यान त्यांच्या विरोधातील चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने उज्वला भोसले या धुळे महापालिकेतील पहिल्या नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या. विशेष म्हणजे भाजपात प्रवेशानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी नगरसेवकपद मिळवण्याचा दुर्मीळ योग त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात उमेदवारीवरून बंडखोरी, पक्षांतर आणि बिनविरोध निवडी अशा घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सुरुवातीलाच चार जागांवर विजय निश्चित करून निवडणूक रणधुमाळीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे.


