
सातारा:प्रतिनिधी
कऱ्हाड : सातारा व सांगली जिल्ह्यांतील तीन तालुक्यांत १०५ गावांसाठी नव्याने साकारणाऱ्या येवती-म्हासोली व गुढे-पाचगणी अशा दोन वेगवेगळ्या उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वतः मंजुरी मिळाली असताना त्यामुळे बरेच शेती ओलिताखाली येणार आहे.
त्यादृष्टीने शासन सर्व्हे करणार आहे. मंगळवार २१जानेवारी पासून वारणावती येथून त्याचा सर्व्हे सुरू होणार आहे. त्या सर्व्हेसाठी शासनाने एक कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर केला.
नव्या योजनांमुळे तिन्ही तालुक्यांतील तब्बल २० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यापूर्वीच्या वाकुर्डे पाणी योजना असा दोन वेगवेगळ्या टप्प्यात साकारल्या जात आहे. त्यासाठी हालचालींनाही गती आली आहे. धरणग्रस्तांचे नेते व श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी एकत्रित दिलेल्या लढ्याला यश आल्याचेही दिसते.
डोंगरी भागाला लाभ होणार
पाण्यासाठी उभारलेल्या लढ्याला चांगले यश येत आहे. त्यासाठी वाकुर्डे पाणी योजना दोन वेगवेगळ्या टप्प्यात विभागण्यात आली आहे. त्यात कऱ्हाड, पाटणसाठी येवती-म्हासोली, तर शिराळा वर तालुक्यासाठी गुढे-पाचगणी उपसा जलसिंचना योजनांना शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कऱ्हाडच्या दक्षिणकडील भागातील ३५, पाटणच्या दहा, तर शिराळा तालुक्यातील ६० गावांचा योजनेत समावेश आहे.
येवती-म्हासोली व गुढे-पाचगणी असा दोन जलसिंचनाचा प्राथमिक आराखडाही तयार आहे. त्यात येवती-म्हासोलीच्या योजनेचे पाणी करुंगली येथे उचलून ते ८० फूट वर नेण्यात येणार आहे. तेथून ते डोंगरी भागातील गावांना पाणी वितरणाची व्यवस्था करण्याचे शासनाचे नियोजन आहे. गुढे-पाचगणी जलसिंचनचे पाणी वारणा नदीच्या पश्चिमेकडील मोहरे गावात बंधार बांधून त्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी येवती-म्हासोलीची योजनेसाठी ४०० तर गुढे-पाचगणी योजनेसाठी ७३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे यश
पाणी संघर्ष समितीचे समन्वयक सुनील शिंदे म्हणाले, ”ओंडच्या काही मोजक्याच लोकांनी याची सुरुवात २०१७ मध्ये केली. त्या वेळी मी स्वतः, तत्कालीन सरपंच बी. टी. थोरात, तात्या थोरात, प्रकाश थोरात यांनी म्हसोलीच्या पाणी आवर्तन योग्य पद्धतीने मिळत नाही, त्यासाठी काहीतरी करा, असे आमचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर त्याला सुरुवात झाली. त्या वेळी पाणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. डॉ. पाटणकर यांच्या सूचनेनुसार बैठका, पाणी परिषदा घेतल्या, जनजागृती केली. सुरुवातीला हेटाळणी झाली. मात्र, आम्ही नेटाने चळवळ चालू ठेवली. त्याचा परिणाम म्हणून आज दोन योजनांचा लाभ तिन्ही तालुक्यांना मिळणार आहे.