सातारा प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या आणि निलंबित असलेल्या उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याला अखेर पोलिस दलातून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा आदेश जाहीर केला.
२३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीने आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बदने याच्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा थेट उल्लेख केला होता. या धक्कादायक घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी तर आरोपींना ‘फिट-अनफिट’ दाखवणे आणि शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे गंभीर आरोप केले होते.
प्रकरण गंभीर असल्याने बदनेला तत्काळ निलंबित करण्यात आले होते. मात्र, चौकशीअंती त्याच्यावरची कारवाई अधिक कठोर करत भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३११ (२)(ब) अन्वये ४ नोव्हेंबरपासून त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
“पोलिस दलाचे ज्ञान असूनही नैतिक अध:पतन, पदाचा दुरुपयोग आणि समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे वर्तन बदनेने केले. त्याचे कृत्य अत्यंत निंदनीय असून पोलिस सेवेत राहण्यास तो तितकाच अयोग्य,” असे दोशी यांनी स्पष्ट केले.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या बदनेवरच्या चौकशी अहवालात त्याने कर्तव्यपालनात गंभीर त्रुटी केल्याचे स्पष्ट झाले. तरुणीच्या आत्महत्येनंतर आरोपांची मालिका समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई अनिवार्य ठरली.
या निर्णयानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबाला थोडा न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. तर प्रकरणातील इतर आरोपांची चौकशी सुरू आहे.


