
सातारा प्रतिनिधी
अधिक मोबदला मिळण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून परतावा न देता सातार्यात महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश मदन धोंगडी (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पैसे गुंतवून अधिक मोबदला मिळण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संगीता चंद्रकांत हेंद्रे (वय ५४, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फसवणुकीची घटना एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली आहे. संशयित योगेश धोंगडी याने विविध फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास आपण चांगला परतावा देवू, असे आमिष महिलांना दाखवले. त्यानुसार तक्रारदार संगीता हेंद्रे यांनी ९ लाख रुपये गुंतवले.
तक्रारदार यांच्या मैत्रिणी तसेच इतर महिलांनीही पैसे गुंतवले. यामध्ये श्वेता जाधव यांनी १ लाख रुपये, गितांजली पाटील यांनी 3 लाख रुपये, आसावरी रानडे यांनी २ लाख रुपये, वर्षा चिंचणे यांनी ४ लाख ५० हजार रुपये, निलम नेसे यांनी 3 लाख रुपये गुंतवले. महिलांनी पैशांची गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळेल, अशी अपेक्षा महिलांना होती. मात्र परतावा मिळेना. यामुळे संशयिताला संपर्क साधून मूळ रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र परतावा व मूळ रक्कमही मिळत नसल्याने अखेर महिलांनी शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार ऐकून गुन्हा दाखल केला आहे.