
सातारा प्रतिनिधी, न्यूज नेटवर्क
कराड येथील खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. सातारा विभागातील सर्व आगारातून १४० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या यात्रेची गर्दी पाहता गाड्या अधिक सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पाल यात्रा १० पासून सुरू झाली असून ती १७ जानेवारी अखेर होणार असून यात्रेसाठी राज्यासह अन्य राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यात्रेमध्ये भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी एसटीचा सातारा विभाग सज्ज झाला आहे.
यात्रेसाठी कराड आगाराचे आगार व्यवस्थापक विक्रम हांडे यांची यात्राप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा २०, कराड २५, कोरेगाव १२, फलटण १०, वाई १२, पाटण १२, दहिवाडी १०, महाबळेश्वर ८, मेढा १५, पारगाव खंडाळा ६, वडूज १० अशा मिळून १४० जादा बसेस यात्रा कालावधीत धावणार आहेत. यात्रेसाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच यात्रा शेड उभारण्यात आले असून त्याठिकाणीही अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी जादा एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले असल्याचे यात्रा व्यवस्थापक विक्रम हांडे यांनी सांगितले.