
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) मोठ्या प्रमाणावर मेगाभरती होणार आहे. भविष्यातील आठ हजार नव्या बसेससाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून या भरतीची ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किमान ३० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. “हजारो युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी असून या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा,” असे आवाहन सरनाईक यांनी केले.
महामंडळाच्या ३००व्या संचालक मंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, ही भरती तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांनुसार राबवली जाणार आहे.
भरती प्रक्रियेअंती निवड झालेल्या उमेदवारांना एसटीमार्फत प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. वाढत्या बसेसची गरज पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.