
सातारा प्रतिनिधी
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करण्याच्या कामाला जिल्ह्यात प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पाणंद रस्ते खुले करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
देसींनी सांगितले की, शासनाचे लोकाभिमुख उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सेवा पंधरवड्यातील मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.पाणंद रस्ते शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहेत. त्यामुळे प्रशासनाने फिल्डवर उतरून या कामाला वेग द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाणंद रस्त्यांना क्रमांक
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे जिथे गावागावातील पाणंद रस्त्यांना ओळख क्रमांक दिला जाणार आहे. आतापर्यंत या रस्त्यांची कोणतीही अधिकृत नोंद नव्हती. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतात पोहोचणे सुलभ होणार आहे.
महाराजस्व अभियानात प्राधान्य
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. “हे काम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे,” असे ते म्हणाले.
सेवा पंधरवड्यातील इतर उपक्रम
या अभियानात दाखले वाटप, घरकुल योजना, स्वस्त धान्य दुकानांवर क्यूआर कोड प्रणाली, तसेच पर्यटनाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण यांसारखे उपक्रमही सुरू आहेत.
पाणंद रस्ते खुले करण्याच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांचे शेतात ये-जा करणे सुलभ होणार असून कायमस्वरूपी रस्त्यांची नोंद निर्माण होणार आहे.