
सातारा प्रतिनिधी
साताऱ्याच्या डोंगररांगा, नागमोडी घाटरस्ते, पहाटेच्या धुक्यातून सुटणारे थंड वारे आणि हजारो धावपटूंच्या पावलांचा ताल… अशा रम्य वातावरणात रविवारी (ता. १५) १४वी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन उत्साहात पार पडली. ‘सातारा रनर्स फाउंडेशन’तर्फे आयोजित या स्पर्धेला देशभरातील धावपटूंकडून उदंड प्रतिसाद मिळाला.
सकाळी साडेसहा वाजता पोलिस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला प्रारंभ झाला. पारंगे चौक, पोवई नाका, शाहू चौक, अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटमार्गे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या पुढे जाऊन ती पुन्हा पोलिस कवायत मैदानावर परतली. नऊ-दहाच्या सुमारास धावपटू परत येऊ लागले आणि पूर्णत्वाचा आनंद व्यक्त करत मैदानात जल्लोषमय वातावरण निर्माण झाले.
संपूर्ण मार्गावर नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्वयंसेवकांनी पाणी, आरोग्यसेवा आणि प्रोत्साहनाची व्यवस्था केली होती. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलिस व प्रशासन सज्ज होते. मॅरेथॉनदरम्यान फिटनेस, आरोग्य व पर्यावरण-जागरुकतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.
हैदराबादहून आलेले अभियंता संदेश नायर म्हणाले, “साताऱ्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात धावणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. धावण्यामुळे ऊर्जा टिकून राहते; म्हणूनच सलग चौथ्यांदा मी या स्पर्धेत सहभागी झालो.”
साताऱ्याच्या निसर्गरम्य डोंगररांगा आणि नागरिकांचा उत्साह यांच्या साक्षीने पार पडलेली ही हाफ मॅरेथॉन केवळ खेळाडूंनाच नव्हे तर शहरालाही एक वेगळीच ऊर्जा देऊन गेली.