
सातारा प्रतिनिधी
शहर परिसरात गुंडगिरीचे थैमान सुरूच असून, युवतीचा विनयभंग करून भावाला पिस्तूल व कोयत्याच्या धाकावर मारहाण करण्याची तसेच रोख रक्कम आणि सोन्याची साखळी लंपास करण्याची दोन थरारक प्रकरणे समोर आली आहेत. या दोन्ही घटनांमुळे सातारा शहर हादरले असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
फिर्यादीनुसार, सहा सप्टेंबर रोजी साडेअकराच्या सुमारास शाहूपुरीतील देवी चौकात युवती भावासोबत गणपती दर्शनाला आली असता पप्पू ऊर्फ संजय लेवे, निखिल वाघ, धनंजय शिंदे, आर्यन लेवे, गोट्या ऊर्फ माधव शिंदे, स्वप्नील चव्हाण, यश घाडगे आणि त्यांचे काही साथीदार यांनी तिचा विनयभंग केला. याला विरोध करणाऱ्या भावाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढे पहाटे दोनच्या सुमारास गडकर आळीतही भावावर हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर अनंत इंग्लिश स्कूल चौकातील धनंजय अॅटो गॅरेज येथे बोलावून भावाला आणि त्याच्या मित्राला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. पप्पू लेवे याने तर भावाच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दुसरी फिर्याद मात्र पप्पू लेवे यांच्याच कडून दाखल झाली आहे. त्यानुसार विश्वजित ऊर्फ सोन्या जाधव, विक्रम ऊर्फ बंडा जाधव, शुभम ऊर्फ गहुल्या जाधव, अनुज पाटील, सुभाष जाधव, ऋतुराज शिंदे, यश साळुंखे व त्यांच्या दोन साथीदारांनी धनंजय अॅटो गॅरेजमध्येच हल्ला चढवला. यामध्ये पप्पू लेवे यांना कोयत्याने व पाइपने मारहाण करण्यात आली, तसेच गळ्यातील सात तोळे सोन्याची साखळी हिसकावून नेण्यात आली. यावेळी विश्वजित जाधव याने कमरेतील पिस्तूल डोक्याला लावून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सातारा शहरातल्या मध्यवस्तीमध्ये उघडपणे शस्त्रांच्या धाकावर झालेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाहूपुरी पोलिसांनी दोन्ही फिर्यादी नोंदवून तपास सुरू केला आहे.