
सातारा प्रतिनिधी
सातारा : गणेशोत्सवाचा उत्साह संपताच मुंबई-पुण्यासह परिसरातील चाकरमानी गावीून परतू लागल्याने रविवारी पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. विशेषतः आनेवाडी व तासवडे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
सकाळपासूनच खासगी गाड्या, बस, ट्रॅव्हल्स, दुचाकी आणि मालवाहतूक वाहनांचा ओघ वाढल्याने टोलप्लाझांवर ताण निर्माण झाला. प्रवाशांचा वेग कासावीस झाला असून, साधारण अर्धा ते एक तास अतिरिक्त प्रवास वेळ वाढला. उष्णतेमुळे आणि गर्दीमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने प्रयत्न केले. टोलबूथमधील कर्मचाऱ्यांनी फास्ट टॅग व रोख रकमेच्या व्यवहाराची गती वाढवण्याचे प्रयत्न केले; मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने गर्दी कमी होण्यास वेळ लागला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा ओघ शहरांकडे वळल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन-तीन दिवस हा वाहनांचा ताण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.