
सातारा प्रतिनिधी
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील उत्सव. समाजातील सर्व स्तरातील लोक यात सहभागी होऊन ऐक्य, भक्ती आणि आनंद साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षांत विसर्जन मिरवणुकांदरम्यान ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी, भांडणे, परवानगीशिवाय मिरवणुका अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने प्रशासनाला कडक पावले उचलावी लागत आहेत. यंदाही सातारा जिल्हा पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात सरळ गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष
विसर्जन मिरवणुकीत हजारो भक्तांचा सहभाग असतो. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत डीजे आणि ध्वनीप्रक्षेपकांचा आवाज वाढतो. यामुळे केवळ ध्वनीप्रदूषणच वाढत नाही, तर रुग्णालय परिसर, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वातावरण, वृद्ध नागरिकांची गैरसोय अशा गंभीर समस्या निर्माण होतात. गेल्या वर्षी अशाच कारणांमुळे अनेक ठिकाणी पोलिसांना ध्वनिक्षेपक जप्त करावे लागले होते. यंदा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आधीच स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कारवाईची तरतूद
*बीएनएस कलम ३५२ : सार्वजनिक शांततेचा भंग – २ वर्षे कैद/दंड
* ध्वनी प्रदूषण अधिनियम २००२ : ध्वनी मर्यादा ओलांडल्यास १ ते ५ लाख दंड
* बीएनएस कलम २२३ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३३, ३६, ३८ : परवानगीशिवाय मिरवणूक – ६ महिने कैद/२,५०० रुपये दंड
*सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ : ५ वर्षे कैद/दंड
* बीएनएस कलम १२६(२), मोटारवाहन कायदा १२२, १८४ : वाहतूक अडथळा – १ महिना कैद/५,००० रुपये दंड
* बीएनएस कलम १९४(२) : जातीय तेढ निर्माण – ५ वर्षे कैद/दंड
याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७, ३८, ३९ व ७० नुसार नियमभंग करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना राहील.
बंदी असलेले प्रकार
* ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादेपलीकडे नेणे
* परवानगीशिवाय मिरवणुका काढणे
* लेझर लाईट्सचा वापर
* धोकादायक वस्तूंचा वापर व सार्वजनिक ठिकाणी अडथळा करणे
गणेश मंडळांसाठी आव्हान
साताऱ्यातील मोठ्या गणेश मंडळांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत यांसारख्या उपक्रमांवर भर दिला आहे. त्यामुळे मिरवणुका पारंपरिक व सांस्कृतिक रंग ठेवून घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र डीजे संस्कृती, लेझर शो, बेकायदेशीर रस्ते अडवणे यामुळे वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आदेश हे मंडळांसाठी शिस्तीचे धडे ठरू शकतात.
प्रशासनाचे आवाहन
“गणेशोत्सव हा भक्तीचा आणि बंधुभाव वाढविण्याचा उत्सव आहे. नियमभंग केल्यास केवळ व्यक्तीवर कारवाई होणार नाही, तर संपूर्ण मंडळाची बदनामी होईल. त्यामुळे उत्सव शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत पद्धतीने पार पाडा,” असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सवातील आनंद अबाधित ठेवून विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तीत पार पडाव्यात, हेच प्रशासनाचे ध्येय आहे. नियमांचे पालन झाले तर पोलिसांची करडी नजरही बंधुभावाच्या वातावरणात सहज मिसळेल. परंतु नियमभंग झाल्यास यंदा मात्र कुणालाही सूट मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.