
सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा येथे ५ ते ८ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या २० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ मध्ये सातारा पोलिसांनी विजेतेपदावर नाव कोरले. सातारा संघाने १७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ६ कांस्य पदके पटकावत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. पुणे ग्रामीण पोलीस संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या मेळाव्यात प्रथमच सुरु करण्यात आलेला ‘सुर्या फिरता चषक’ सातारा संघाच्या नाकोटीक शोधक श्वान ‘सूचक’ ने पटकावला. २०२४ मध्ये रांची (झारखंड) येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्णपदक जिंकलेल्या ‘सुर्या’ या श्वानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा चषक देण्यात आला.
मेळाव्याचे उद्दिष्ट पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्याची चाचणी घेणे आणि विविध क्षेत्रांतील कार्यकुशलता वाढविणे हे होते. तपास कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, घातपातविरोधी तपासणी, संगणक वापर, श्वान स्पर्धा आदी प्रकारांमध्ये परिक्षेत्रातील पथकांनी ताकद आजमावली. यंदाच्या मेळाव्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील १३० अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदविला.
मेळाव्यातील विविध स्पर्धा पोलीस मुख्यालय, शिवतेज हॉल, पोलीस परेड ग्राउंड, सांस्कृतिक हॉल, वायसी कॉलेज आदी ठिकाणी घेण्यात आल्या. समारोपप्रसंगी सांस्कृतिक हॉल, राधिका रोड येथे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून साताऱ्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. सुरेखा कोसमकर उपस्थित होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनिल फुलारी यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण व साताऱ्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
विजेत्यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी कौतुक केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी सर्व संघांना शुभेच्छा देण्यात आल्या.