
सातारा | प्रतिनिधी
सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने उल्लेखनीय कारवाई करत तब्बल ९ लाख रुपये किंमतीचे ४१ हरवलेले स्मार्टफोन परत मिळवले आहेत. तांत्रिक साधनांचा वापर, चिकाटी आणि नियोजनबद्ध मोहिमेमुळे ही कारवाई यशस्वी झाली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाने शोधमोहीम सुरू केली होती.
सीईआयआर पोर्टलच्या मदतीने आणि तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्र व इतर राज्यांमधून हरवलेले मोबाईल शोधून धारकांशी संपर्क साधण्यात आला. अखेर एकूण ४१ स्मार्टफोन पोलिसांनी हस्तगत केले. या कामगिरीबद्दल नागरिकांतून कौतुक व्यक्त होत आहे.
सदर मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा होता. यामध्ये सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचारीदेखील सहभागी होते. पोलिसांनी यापुढेही अशी मोहिम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.