
सातारा प्रतिनिधी
पिठाच्या गिरणीतून उभं राहिलेलं स्वप्न… आणि त्याला मिळालेलं यशाचं सोनं! जावली तालुक्यातील वालूथ गावच्या मोहिनी अनिल गोळे-किर्दत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत सलग तीन वेळा यश मिळवत साताऱ्याचा झेंडा उंचावला आहे. एकाच वर्षात तीन सरकारी नियुक्त्या मिळवणारी मोहिनी जिल्ह्यातील अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.
मोहिनीच्या या यशानंतर साताऱ्यात तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या वडिलांनी चालवलेली साधी पिठाची गिरणी आज मोहिनीच्या मेहनतीच्या जोरावर प्रेरणेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
स्वप्नं होती मोठी, पण पाया होता साधा
मोहिनीचं प्राथमिक शिक्षण वालूथच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण हुमगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेत असताना दहावीत तब्बल ९४.९६ टक्के गुण मिळवत शाळेत पहिल क्रमांक पटकावला.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे ११वी-१२वीचे शिक्षण पूर्ण करून तिने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी मिळवली.
अभियांत्रिकीपासून एमपीएससीपर्यंतचा प्रवास
इंजिनिअरिंगनंतर काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मोहिनीच्या मनात होती. तीच जिद्द तिच्या अभ्यासात उतरली आणि एमपीएससी परीक्षेला तीने भिडण्याचा निर्णय घेतला. सलग मेहनत, चिकाटी, अपार कष्ट या जोरावर तिने एकामागून एक तीन यशं गाठली –
मार्च २०२४: जलसंपदा विभाग, पुणे – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
ऑक्टोबर २०२४: जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
जुलै २०२५: सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
वडिलांच्या कष्टांना आलेला मानाचा मुजरा
“मुलींना शिकवायचं, मोठं करायचं हेच स्वप्न होतं. त्यासाठी मी आणि पत्नीने दिवस-रात्र एक करून पिठाची गिरण चालवली. आज मोहिनीच्या यशामुळे आमच्या कष्टांना खरी किंमत मिळाली,” अशी भावना मोहिनीचे वडील अनिल गोळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
तालुक्याचा डंका, राज्यात गौरव
साताऱ्यातून, विशेषतः ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थ्यांसाठी मोहिनीचं हे यश एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या मोहिनीने दाखवून दिलं की, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कुठलीही शिखरं गाठता येऊ शकतात.
जावलीची मुलगी… आता महाराष्ट्राची अधिकारी!
मोहिनी गोळे-किर्दतचं हे यश फक्त तिचं नाही, तर तिच्या आई-वडिलांच्या कष्टाचं, गावकऱ्यांच्या आशीर्वादाचं, आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या कणखर जिद्दीचं आहे.