
पुणे प्रतिनिधी
मराठी माणसांना “आमच्या पैशावर जगतात” म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आज चोख उत्तर दिलं. “एक्सवर पोस्ट करुन वायझेड करणं बंद करा, नाहीतर आमच्या हातात असलेल्या बांबूचा वापर कुठे आणि कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे!” अशा शब्दांत त्यांनी दुबेंना कडक इशारा दिला.
“माज असेल तर तुमच्या राज्यात टॅक्स भरा”
वसंत मोरे यांनी थेट सवाल केला — “एवढा माज असेल तर तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे उद्योगधंदे करा. महाराष्ट्रातील मराठी माणसाचे उद्योग तुम्ही का घेता?” त्यांनी बाहेरच्या लोकांवर टीका करत सांगितले की, “एसीत बसून असं वादग्रस्त बोलतात आणि भोग भोगतात ते मात्र महाराष्ट्रातल्या लोकांना.”
दुबे यांना थेट धमकी – “बांबू आमच्याकडे तयार आहे!”
मोरे पुढे म्हणाले, “जर ते (भाजप खासदार) मारामारीसाठी येणार असतील, तर लक्षात ठेवा, आमच्याकडे बांबू आहेत. आणि हा बांबू कुठे वापरायचा हे आम्हाला ठाऊक आहे.”
“टॅक्स किती देतो हे फडणवीसांना विचारा!”
दुबे यांनी मराठी माणसांवर “आमच्या पैशावर जगतात” अशी टीका करताच मोरे संतप्त झाले. त्यांनी प्रत्युत्तरात म्हटलं, “तुम्ही किती टॅक्स देता हे शिवसेना किंवा मनसेला न विचारता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा. तेच म्हणतात महाराष्ट्र नंबर वन आहे. मग तो नंबर वन बाहेरच्या लोकांमुळे आहे का?”
“व्यापार करा, राजकारण नको!”
मोरे म्हणाले, “बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी राजकारणात शिरकाव करू नये. त्यांना जर राजकारण करायचं असेल, तर आधी भाजपचे केडिया साहेबांना फोन करून विचारा.” याचबरोबर त्यांनी निशिकांत दुबेवर सडकून टीका करत म्हटलं, “दुबेंची पिळावळ वाढली आहे. त्यांना प्रांतवाद करायचा आहे.”
“महिनाभर दुकाने बंद करा, मग पाहू कोण उपाशी मरतंय”
मीरा रोडमध्ये “मराठी माणसे चार दिवसांत उपाशी मरतील” असं विधान करणाऱ्यांना वसंत मोरे यांनी खुलं आव्हान दिलं –
“चार-पाच दिवस नाही, महिनाभर दुकाने बंद करा. मग पाहू कोण उपाशी मरतंय!”
त्यांनी मराठी जनतेला आवाहन केलं की, “ज्यांनी दुकाने भाड्याने दिली आहेत, त्यांनी आता विचारणा करावी.”
“ठाकरे ब्रँड फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे!”
मोरे यांनी ठाकरे गटाचा इशारा स्पष्ट करत सांगितलं, “त्यांना ठाकरे ब्रँड काय आहे ते माहिती आहे. आतापर्यंत फक्त ट्रेलर दाखवला, पिक्चर बघायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावं.”
दुबे यांची वादग्रस्त मुक्ताफळं
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादळ उठलं आहे. त्यांनी म्हटलं होतं –
“मराठी लोक आमच्या पैशावर जगतात”, “खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे काही नाही”, तसेच “मराठी आंदोलक म्हणजे सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत.”
त्यांच्या या वक्तव्यावर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
राज्यातील मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. निशिकांत दुबे यांचं वक्तव्य आणि त्यावर वसंत मोरे यांची संतप्त प्रतिक्रिया पाहता, हा वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.