
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणं सक्तीचं करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून पुन्हा एकदा वादंग पेटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. केंद्र सरकारनेच राज्यांना स्वायत्तता दिली आहे, मग हा हिंदी लादण्याचा हट्ट का?” असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याचं सरकारनं सांगितलं असलं तरी अद्याप त्रिभाषा सूत्र लागू केलं जाणारच नाही असं अधिकृतपणे म्हटलेलं नाही. याबाबतचा जीआर सरकारने अद्यापही काढलेला नाहीय.#मराठी #हिंदीभाषा @dadajibhuse @Dev_Fadnavis @RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/bosys37xe3
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 18, 2025
राज ठाकरेंनी याआधी दोन वेळा सरकारला पत्र पाठवलं होतं, परंतु आता थेट महाराष्ट्रातील शाळांचे मुख्याध्यापक यांना उद्देशून तिसरं पत्र लिहिलं आहे. “शाळांनी सरकारच्या या धोरणाला सहकार्य करू नये. अन्यथा विद्यार्थ्यांवर लादलेली भाषा हटवण्यासाठी मनसैनिक तयार आहेत,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत!”
“मुख्यमंत्री राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आधार घेतात. पण केंद्रानेच राज्यांना स्थानिक गरजांनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. हे केंद्राचं धोरण नसून, राज्यसरकारचं गुप्त अजेंडा आहे. मग खोटं बोलण्याची गरज काय?” असा रोखठोक सवाल करत राज ठाकरेंनी फडणवीसांवर आक्रमण केलं.
“हिंदी शिकवतातच कशा हे पाहतो!”
“हिंदी कुणाला शिकायची आहे ते त्यांनी शिकावी, पण शाळांवर ती लादू नका. शाळा हिंदी शिकवतातच कशा, हे पाहिलं जाईल. हे धोरण आयएएस अधिकाऱ्यांसाठी आहे का, की महाराष्ट्राच्या मुलांसाठी? जर गुजरातमध्ये सक्ती नाही, आंध्र-तामिळनाडूतही नाही, मग महाराष्ट्रातच का?” असा संतप्त सवाल करत ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकमुखी धोरणावर जोरदार हल्ला चढवला.
“मराठी भाषा संपवण्याचा डाव!”
“उत्तर भारतात मराठी शिकवली जाते का? मग इथे हिंदी का लादली जातेय? जर मराठीचं अस्तित्व धोक्यात आलं तर साहित्य, संस्कृती, अभिमान – सगळं संपून जाईल. केंद्राच्या वरवंट्याखाली मराठीचा चिरडून नायनाट केला जाणार आहे. आज जर जागं नाही झालो, तर उद्या उशीर होईल,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
“शाळांनी सरकारला साथ दिली, तर चर्चा नाही – कारवाई होईल!”
शाळांना स्पष्ट इशारा देताना राज ठाकरेंनी म्हटलं, “जर सरकारला साथ दिली, तर मुलांचे नुकसान होईल. आम्ही पालकांसोबत आहोत. मुलांना ऐच्छिकपणे भाषा शिकू द्या, पण जबरदस्ती नको. अन्यथा मनसे मैदानात उतरेल, आणि मग फक्त चर्चा नाही – कृती पाहायला मिळेल.”
“सरकार कागदी घोडे नाचवतंय”
एप्रिलपासून शिक्षण विभागाने गोंधळ माजवलेला असून, सरकार छुप्या मार्गाने पुस्तकांची छपाई करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “हे धोरण लोकशाहीचं नाही, राजकीय अजेंड्याचं आहे. आता वेळ आलीय की सगळ्यांनी ठाम भूमिका घ्यायला हवी,” असं म्हणत त्यांनी इतर पक्षांनाही या लढ्यात सामील होण्याचं आवाहन केलं.